Anna Bansode | अण्णा बनसोडे यांचा आमदारकीचा नाट्यमय किस्सा – अजित पवारांनी सांगितला रंजक अनुभव

Anna Bansode पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले. या अभिनंदनाच्या भाषणादरम्यान अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील अण्णा बनसोडे यांच्या तिकीटाच्या संघर्षाचा रंजक किस्सा उपस्थितांसमोर मांडला.

अजित पवार यांनी सांगितले की, अण्णा बनसोडे यांनी आपल्या “आपला कामाचा माणूस” या टॅगलाईनखाली निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनतेशी संपर्क साधला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांना अवघ्या 2,000 मतांनी पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, 2019 मध्ये अण्णांनी जोरदार पुनरागमन केले आणि 17,000 मतांनी विजय मिळवला. हा विजय सोपा नव्हता आणि त्यामागे एक मोठा संघर्ष आणि नाट्यमय प्रसंग घडला होता, असे अजित पवार यांनी सांगितले.

Anna Bansode अजित पवार म्हणाले, “2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णा बनसोडे यांना तिकीट नाकारले होते. पक्षाने सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली होती. मी तेव्हा शांत होतो. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. मी जयंत पाटील यांना विचारलं, ‘अण्णांचं तिकीट का कापलं?’ ते म्हणाले, ‘दादा, सगळंच काही माझ्या संमतीनं होत नाही.’ मी म्हटलं, ‘हरकत नाही.’ पण मला अण्णाला संधी द्यायची होती.”

अजित पवार पुढे म्हणाले, “माझा जिल्हा मोठा असल्याने जयंतरावांनी मला दोन ए. बी. फॉर्म जास्त दिले होते. मी रात्री 12 वाजता मुंबईतून निघालो. अण्णाला एक्सप्रेस हायवेच्या टोकाला रात्री अडीच वाजता बोलावलं. अण्णाला पाहून मी म्हणालो, ‘हा ए. बी. फॉर्म घे आणि उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरून टाक.’ अण्णा गोंधळला आणि म्हणाला, ‘पण तिकीट तर सुलक्षणा शिलवंत यांना जाहीर झालं आहे.’ त्यावर मी म्हणालो, ‘तुला काय करायचं आहे ते कर. फॉर्म घे आणि अर्ज भर.’

अजित पवार पुढे म्हणाले, “मी गुपचूप अण्णाकडे फॉर्म दिला आणि अर्ज भरायला लावला. जयंतरावांना फोन करून म्हटलं, ‘थोडं वेगळं केलंय, तुमची संमती द्या.’ जयंतराव म्हणाले, ‘काय केलं आहे ते असू द्या, संमती आहे. पण माझं नाव कुठेही सांगू नका.’ दुसऱ्या दिवशी सुलक्षणा शिलवंत सकाळी सव्वा अकराला अर्ज भरायला गेल्या तेव्हा तिथे अण्णा आधीच अर्ज भरून मोकळा झाला होता. अधिकाऱ्यांनी विचारलं, ‘तुमचं राष्ट्रवादीचं तिकीट कुठून आलं?’ त्यावर अण्णाने शांतपणे उत्तर दिलं.”

या नाट्यमय घडामोडीनंतर अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. 17,000 मतांनी मिळवलेला हा विजय केवळ अण्णांच्या मेहनतीमुळेच नाही, तर अजित पवार यांच्या अचूक राजकीय डावपेचांमुळेही शक्य झाला. आज अण्णा बनसोडे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. अजित पवार यांनी सांगितलेल्या या नाट्यमय प्रसंगामुळे सभागृहात हशा पिकला आणि उपस्थित आमदारांनी टाळ्यांच्या गजरात अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Comment